Narendra Modi: पंतप्रधान मोदी हिटलरच्या वाटेनं चालले, तर...; काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:57 PM2022-06-20T16:57:09+5:302022-06-20T16:57:58+5:30
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुबोध कांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील काँग्रेसच्या सत्याग्रहावेळी मोदींवर जोरदार टिका केली
नवी दिल्ली - देशात सध्या अग्निपथ योजनेवरुन गदारोळ माजला आहे. युपी-बिहारसह देशातील अनेक राज्यात या योजनेला विरोध करण्यात आला आहे. तरुणाईने रस्त्यावर उतरून जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर, विरोधी पक्षांनीही या योजनेवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसने ही योजना मागे घेण्याची मागणी करत आंदोलकाचे समर्थन केले. त्यानंतर, आता काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेसंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या शब्दात टिका केली.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुबोध कांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील काँग्रेसच्या सत्याग्रहावेळी मोदींवर जोरदार टिका केली. यावेळी त्यांनी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे हिटरच्या पाऊलावर पाऊल टाकत आहेत. हिटलरही याच मार्गावरुन चालत होता. हिटलरप्रमाणेच त्यांचाही शेवट होईल, असे वादग्रस्त विधानही सहाय यांनी केले. मात्र, या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिका होऊ लागली. त्यामुळे, त्यांनी आपल्या विधानासंदर्भात सारवासारव केली. तसेच, मी जे बोललो ती घोषणा आहे, नरेंद्र मोदींनाही विचारा, त्यांनीही ही घोषणा दिली असेल, असे स्पष्टीकरण सहाय यांनी दिले.
#WATCH | Modi will die Hitler's death if he follows his path, says Congress leader Subodh Kant Sahay at party's 'Satyagrah' protest against ED questioning of Rahul Gandhi & Agnipath scheme in Delhi pic.twitter.com/fO8LfRShvK
— ANI (@ANI) June 20, 2022
कांत सहाय यांनी काय म्हटलं
सुबोधकांत सहाय यांनी म्हटलं होतं की, हिटलरनेही अशीच एक संस्था बनवली होती. त्याचे नाव खाकी असं होते. सैन्यातून त्याने ही सेना स्थापन केली होती. पंतप्रधान मोदी हेही हिटलरच्या मार्गावरच चालत आहेत. त्यानंतर, पंतप्रधान मोदींसंदर्भात अतिशय वादग्रस्त टिकाही सहाय यांनी केली होती. दरम्यान, भाजप समर्थकांकडून सहाय यांच्या विधानानंतर संताप व्यक्त होत आहेत. तसेच, सोशल मीडियावरुन भाजप समर्थकांकडून रोषही व्यक्त करण्यात येत आहे.