नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वच्छतेबाबत नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे, त्यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी देशातील नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्री दिला. पंतप्रधान पदावर असताना आणि लाल किल्ल्यावरुन भाषण ठोकतानाही मोदींनी शौचालय आणि स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांना अनेकदा स्पर्श केला आहे. आता, राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान परिसरातील एका बोगद्याच्या उद्घाटनावेळी त्यांची कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बोगद्यातील रस्त्यावर दिसलेला कचरा त्यांनी आपल्या हातांनी उचलल्याचे दिसून आले.
नरेंद्र मोदींनी आज 1.6 किमी लांब बोगद्याचे उद्घाटन केले. त्यासोबतच, अनेक अंडरपास रस्तेकामांचे लोकार्पणही केले. दिल्लीच्या प्रगती मैदान इंटीग्रेटेड ट्रांजिट कॉरिडोरअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या ITPO च्या नवीन बोगद्यात पडलेला कचरा मोदींनी स्वत:च्या हातांनी उचलला. या बोगद्यातून चालत असताना मोदींनी रस्त्यावर कागदाचा कचरा दिसला, तो प्रथम त्यांनी उचलला. पुढे चालत असताना एक रिकामा पाण्याची बाटली मोदींना दिसून आली. मोदींनी ती बाटलीही उचलून आपल्या हाती घेतली. बाटलीचे झाकण बंद केल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.
दिल्लीकरांनी आज केंद्र सरकारकडून आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चरचे एक मोठे गिफ्ट मिळाले आहे. एवढ्या कमी वेळात एकीकृत कॉरिडोर निर्माण करणे सोपे काम नव्हते. ज्या रस्त्यांच्या आजुबाजूला हा कॉरिडोर बनला आहे, ते रस्ते दिल्लीतील सर्वात गतीमान आणि वाहतुकीचे रस्ते आहेत. देशाच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी सर्वच सुविधा असायला हव्यात. एक्झिबेशन हॉलही असावा, त्यासाठी भारत सरकार निरंतर काम करत आहे, असे मोदींनी या कार्यक्रमावेळी संबोधित करताना म्हटले.