नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. पाकिस्तानला आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफला भेटायला आम्ही गेलो होतो का ?. पठाणकोटमध्ये कोण आले होते ते, आयएसआयवाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं ? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे. पाकिस्तानला मोदीच गेले होते, नवाझ शरीफ यांना त्यांनीच मिठी मारली होती. स्वत:च्या शपथविधी सोहळ्याला त्यांनीच नवाझ शरीफला आमंत्रण देऊन मोठं नाटक केलं, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी एअर स्ट्राईकसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यास उत्तर देताना मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल यांनी केला. मी त्या प्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. मात्र, कालच मी बातमी वाचली. त्यामध्ये पुलमावा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याचं म्हटलं आहे. त्या पीडित कुटुंबीयांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसनेही त्याबाबत भूमिका घेतली आहे. भाजपाकडून काँग्रेस नेत्यांवर पोस्टर बॉय असल्याचा आरोप करण्यात येत आहे, याबाबतच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींनी खरे पोस्टर बॉय मोदीच असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानला तेच गेले होते, त्यांनी गळाभेट घेतली, त्यांनीच नवाझ शरीफ यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं, असे सांगत राहुल गांधींनी एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरुन मोदींना लक्ष्य केलं. तसेच याबाबत मी अधिक काहीही बोलू इच्छित नसल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं.
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून पुलवामा येथे भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करत पाकवर अन् दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई केली. पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसत हल्ल्याचा प्रयत्न केला. याला प्रत्यूत्तर देताना पाकचे एफ-16 आणि भारताचे मिग 21 बायसन ही विमाने पडली. त्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले असून भारतानेही चोख प्रत्यूत्तर दिले आहे. मात्र, या सर्व प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. आगाली लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपाचे काही नेते या एअर स्ट्राईकचं भांडवल करत आहेत. तर, काँग्रेस अन् विरोधकांकडून किती दहशतवादी मारले, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच याबाबत पुरावेही मागितले जात आहेत.