- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत एकही प्रश्न उत्तरासाठी घेतला नाही; परंतु २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर काय काय होणार याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्या संकेतांनुसार ते २५ मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील.केंद्रात भाजप स्वत:च्या बहुमतावर सरकारची स्थापना करील, असा दावा करताना मोदी यांनी त्यांचे सरकार अजिबात वेळ न दवडता होईल तेवढ्या लवकर कामाला सुरुवात करील, असे संकेत दिले. १६ मे, २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी १० दिवस घेतले होते.यंदा मोदी यांना जिंकण्याचा आत्मविश्वास असून, पुढील सरकारच्या योजना आणि १०० दिवसांची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला, तर मोदी त्यांचा ‘मन की बात’ हा दर महिन्याचा आकाशवाणीवरील कार्यक्रम २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू करतील. अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, मोदी हे बहुमतापासून थोडेसे दूर राहिले, तर २५ मे रोजी पदाची शपथ डामडौल न करता घेतील व ‘मन की बात’ही करतील. मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रम गेल्या मार्च महिन्यात स्थगित केला होता व तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा तो सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते.ल्युटेन्स दिल्ली आणि खान मार्केट टोळीच्या कारवायांची मोदी यांना आता पूर्ण ओळख झाली असून, गेल्या पाच वर्षांत त्यांनी त्या सगळ्यांना यशस्वी तोंड दिले आहे. ते आता सरकार स्थापन करण्यास अजिबात विलंब लावणार नाहीत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा नाही. मिळाले तरीही राष्ट्रपती मोदी यांना २४ मे रोजी १७ वी लोकसभा अधिसूचित होताच सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून सरकार स्थापन करण्यास बोलावतील.भाजपध्यक्ष अमित शहा यांनी भाजपेतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांना रालोआच्या कार्यक्रम पत्रिकेवर विश्वास असेल, तर रालोआमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन ठेवलेले आहे. आमची दारे त्या सगळ्यांसाठी उघडी आहेत, असे ते म्हणाले.
खासदारांना आदेशनिवडणूक लढवलेल्या भाजपच्या खासदारांनी त्यांचा विजय जाहीर झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेऊन २४ मे रोजी राजधानीत परत यावे, असे भाजपने त्यांना कळवले आहे.