कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रकाश सिंग बादलांना पंतप्रधान मोदींचा फोन, असं आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 05:03 PM2020-12-08T17:03:24+5:302020-12-08T17:04:48+5:30
बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता.
नवी दिल्ली - केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्याला सुरुवातीपासूनच उघडपणे विरोध करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते, तथा पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी बादल यांना त्यांच्या 93व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तत्पूर्वी, बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. एवढेच नाही, तर बादल यांनी या कायद्याविरोधात पद्म विभूषण पुरस्कारही परत करण्याची घोषणा केली होती.
दीर्घकाळ भाजपचा सहकारी राहिलेल्या अकाली दलाने कृषी कायद्याच्या मुद्द्यावरूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचे (एनडीए) आपले नाते तोडले होते. त्यांची सून हरसिमरत कौर बादल यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. कारण पंजाबमध्ये कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू होते.
आता अमित शाहंसोबत शेतकऱ्यांची चर्चा -
'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले नवी दिल्ली: 'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेतकऱ्यांकडून वाहतूक, दुकाने आणि इतर सेवा ठप्प करण्यात आली. यातच सकाळी अमित शहा यांच्याकडून बैठकीसंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांची भेट घेतील. ही बैठक अनौपचारिक असेल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत.