नवी दिल्ली - विरोधक किमान आधारभूत किंमतीसंदर्भात (एमएसपी) शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप करत, देशात एमएसपीदेखील राहणार आणि शेतकऱ्यांना कोठेही आपला माल विकण्याचा अधिकारही राहणार, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच वेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरही जबरदस्त हल्ला चढवला.
पंतप्रधान मोदींनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'नमामी गंगे'अंतर्गत उत्तराखंडमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, मुनीच्या रेती आणि बद्रीनाथमध्ये एसटीपी आणि गंगा संग्रहालयाचे दिल्ली येथून डिजिटल लोकार्पण केले. यानंतर बोलतांना मोदींनी कृषी विधेयकांवरून विरोधकांवर हल्ला चढवला.
शेतकरी -विरोधकांचे नव न घेता मोदी म्हणाले, ''स्वामीनाथन आयोगाने म्हटल्याप्रमाणे आमच्या सरकारने एमएसपी लागू करण्याचे काम केले. मात्र, हे एमएसपीवरच शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. देशात एमएसपीदेखील राहणार आणि शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याचे स्वातंत्र्यदेखील असेल.''
जनधन - पंतप्रधान मोदी म्हणाले संपूर्ण देशाने पाहिले आहे. जनधन बँक खात्यामुळे लोकांना कशा प्रकारे लाभ मिळाला. जेव्हा हे काम आमच्या सरकारने सुरू केले, तेव्हा हेच लोक याला विरोध करत होते. देशातील गरिबाचे बँक खाते उघडावे, त्यांनाही डिजिटल देवाणघेवाण करता यावी, याला या लोकांनी नेहमीच विरोध केला आहे.
योग दिवसपंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या पुढाकाराने जेव्हा संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत होते, तेव्हा भारतातच बसलेले हे लोक त्याला विरोध करत होते. जेव्हा सरदार पटेलांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण होत होते, तेव्हाही हे लोक त्याला विरोध करत होते. आजपर्यंत यांचा एकही नेता स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी गेला नाही.
सर्जिकल स्ट्राइक -मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. या लोकांनी देशासमोर आपला हेतू स्पष्ट केला आहे.
राम मंदिर -मोदी म्हणाले, गेल्या महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराचे भूमीपूजन झाले. मात्र, हे लोक आधी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराला विरोध करत होते आणि नंतर भूमिपूजनाला विरोध करू लागले. त्यामुळे प्रत्येक बदल्या तारखेबरोबर विरोधासाठी विरोध करणारे हे लोक अप्रासंगिक होत चालले आहेत, असेही मोदी म्हणाले.