लखनौ - दिग्गज अभिनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा सध्या मोदी सरकारवर शाब्दीक वार करताना दिसून येतात. तर, जाहीरपणेही त्यांनी मोदींच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा हे थेट मोदींविरुद्धच निवडणुकांच्या मैदानात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या वाराणसी मतदारसंघातूनच सिन्हा निवडणूक लढवतील, अशीही माहिती पुढे येत आहे.
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाकडून खा. शत्रुघ्न सिन्हा यांना मोदींविरुद्ध वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे नावाजलेले अभिनेते असल्याने त्यांची देशभर ओळख आहे. तसेच सिन्हा यांना वाराणसीतील कायस्थ समाजाचाही पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींविरुद्ध निवडणूक लढविल्यास भाजपला अडचणीचे ठरू शकते. त्याचबरोबर, नुकतेच उत्तर भारतीय नागरिकांना गुजरातमधून हाकलून देण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचाही परिमाण उत्तर प्रदेशमधील मोदींच्या वाराणसी संघात जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनौ येथील एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासमवेत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना सिन्हा यांनी राफेल करारासंदर्भात मोदी सरकारवर टीका केली. तसेच या करारावेळी हिंदुस्थान एरोनॅटीक्स लिमिटेडला बाजूला का करण्यात आले, असा सवालही त्यांनी विचारला.