नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मात्र, या सोहळ्यात विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार नसल्यानं वाद निर्माण झाला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होऊ घातलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, यावर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
''राष्ट्रपतींऐवजी दुसरं कोणी जर पुरस्कार देणार असतील तर ते आमचे कष्ट, आमच्या भाषेचा अपमान आहे'', असं सांगत प्रसाद ओक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कच्चा लिंबू या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी प्रसाद ओक आणि निर्माते मंदार देवस्थळी हे नवी दिल्लीला गेले असून त्यांनीही पुरस्कार वितरण सोहळ्याच्या बदलण्यात आलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ''हे काय गल्लीतील लोकांना जमून केलेलं नाटक आहे का? ज्याला गल्लीतला कोणीतरी येऊन पुरस्कार देतो ? हे राष्ट्रीय पुरस्कार आहेत जे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. आम्हाला पुरस्कारासाठी जे पत्र पाठवण्यात आलेले आहे त्यावरही ठळक अक्षरात हे पुरस्कार राष्ट्रपती प्रदान करतील असं लिहलेलं आहे'', अशा शब्दात प्रसाद ओक यांनी संताप व्यक्त केला.