नवी दिल्ली : आताच्या घडीला देशात बेरोजगारी (unemployment) हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच केंद्राकडून देण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या १० महिन्यात तब्बल १० हजार कंपन्या बंद झाल्या. नॅशनल इलेक्शन सर्व्हेमध्ये २०१९ मधून देशातील बेरोजगारीची समस्या तीव्र होत चालली असून, तरुणांना सरकारी नोकरीच हवी असल्याची बाब समोर आली आहे. (national election survey says unemployment is the biggest concern of the youth and govt jobs are the first choice)
राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात २५ टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. मध्य भारतातील २९ टक्के, उत्तर भारतातील ३४ टक्के आणि दक्षिण पूर्व भारतातील १६ टक्के तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले.
ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी
बेरोजगारीची तरुणांना सर्वाधिक चिंता
२०१९ मध्ये केलेल्या या सर्व्हेत काही प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी केंद्रातील एनडीए कार्यकाळात गेल्या ५ वर्षांत रोजगाराच्या संधी वाढल्या का, या प्रश्नावर ४५ टक्के तरुणांनी नकारात्मक, तर २८ टक्के तरुणांनी सकारात्मक उत्तर दिले. गेल्या तीन ते चार वर्षांत नोकरी शोधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला की नाही, या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला ४९ टक्के तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही तरुणांच्या मते याच कालावधीत नोकरी शोधताना अधिक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागला.
सरकारी नोकरीला सर्वाधिक प्राधान्य
देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला. तर १० पैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.
कोरोना काळात चिंता वाढली
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची समस्या आणखीनच तीव्र झाल्याचे समोर आले आहे. खेडी, गाव, शहरे येथील तरुणांची बेरोजगारीची समस्या यांमुळे वाढली आहे. बेरोजगारीची चिंता तरुणांमध्ये अधिक असल्याचेही या सर्व्हेमधून समोर आले आहे.