मुंबई : कामगारांच्या विविध प्रश्नावर देशांतील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने रविवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.याबाबत कामगार संघटना कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितले की, कोरोनाचे सर्व नियम पाळून आंदोलन केले जाणार आहे. केंद्रीय कामगार संघटना नेत्यांचे संयुक्त निवेदन देशाच्या नावे कोट्यवधी जनतेच्या सह्यांसह पाठविण्यात येणार आहे. सर्व उद्योगांचे, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे व अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे प्रश्न या निवेदनात आहेत.सर्व कामगार संघटनांनी अग्रक्रमाने याला गती द्यावी. प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ९ आॅगस्ट रोजी शहीद स्मारक किंवा मध्यवर्ती चौकात कामगार संघटनांनी कोरोनाचे नियम पाळत निदर्शने व सत्याग्रह असे कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, ९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनतेने ब्रिटिशांविरोधात छोडो भारत आंदोलन केले. मुंबईचे आॅगस्ट क्रांती मैदान हे चळवळीचे केंद्र होते. याच ठिकाणी ९ आॅगस्टला कोरोना व कायद्याच्या मर्यादेत मुंबईतील कामगार संघटना समन्वय करून मानवी साखळी करून मागण्यांचे फलक प्रदर्शित करतील़
कामगारांचे आज देशव्यापी आंदोलन; राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:02 AM