डॉक्टरांवरील हल्ल्याचे देशभर होणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:12 PM2020-01-20T13:12:15+5:302020-01-20T13:15:58+5:30
विविध मुद्यांवर सुमारे साडेतीन लाख डॉक्टरांकडून माहिती संकलित केली जाणार
राजानंद मोरे -
पुणे : देशभरात डॉक्टर व रुग्णालयांवर होणाºया हल्ल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून सर्वेक्षण केले जाणार आहे. हल्ला करणारे, हल्ल्याची कारणे, प्रकार, वेळ, ठिकाण, हल्ल्यामुळे झालेला शारीरिक, मानसिक त्रास, त्यासंदर्भात करण्यात आलेली तक्रार यांसह विविध मुद्यांवर सुमारे साडेतीन लाख डॉक्टरांकडून माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित केलेली माहिती केंद्र सरकारला सादर केली जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून डॉक्टर व रुग्णालयांवरील हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शासकीय, खासगी मोठ्या रुग्णालयांसह क्लिनिकमध्येही अशा घटना घडत आहेत. हल्ल्यांप्रमाणेच मानसिक त्रास, शिवीगाळ, धमकावणे, ब्लॅकमेल करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देणे अशा विविध प्रकारे डॉक्टरांना त्रास दिला जातो. प्रामुख्याने रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होणे किंवा तो दगावल्यानंतर नातेवाईक, मित्रांकडून डॉक्टर व रुग्णालयांवर हल्ले केले जातात. २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटना वाढत चालल्याने देशातील २२ राज्यांमध्ये डॉक्टरांवरील हल्लाविरोधी कायदा करण्यात आला आहे. पण अनेक डॉक्टर किंवा खासगी रुग्णालये भीतीमुळे तक्रार करत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. केवळ मोजकीच प्रकरणे समोर येतात.
या पार्श्वभूमीवर ‘आयएमए’ने देशभरातील डॉक्टरांवरील हल्ल्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आयएमएचे सुमारे साडेतीन लाख सदस्य आहेत. त्या सर्वांकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये डॉक्टरची सर्व वैयक्तिक माहितीसह हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहितीचा समावेश आहे. डॉक्टरांविरोधात होणाºया हिंसेला जबाबदार कोण होते, हल्ल्याचे ठिकाण (क्लिनिक, वॉर्ड, आयसीयू, घर, रस्ता आदी) कोणते, कोणत्या वेळेत (सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री) घटना घडली, घटनेत दुखापत झाली का, हल्ला झाल्यानंतर काय केले, किती वेळा अशा घटनांचा सामना करावा लागला अशा विविध प्रश्नांचा समावेश प्रश्नावलीमध्ये आहे. तसेच या घटनांमुळे व्यवसायावर, वैयक्तिक पातळीवर तसेच कौटुंबिक आयुष्यात कोणते परिणाम झाले, याची माहिती घेणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत, या प्रश्नाद्वारे डॉक्टरांकडून त्यांच्या सूचनाही संकलित केल्या जाणार आहेत.
.............
डॉक्टरांवर केवळ शारीरिक हल्लेच होत नाहीत. विविध प्रकारे मानसिक, शाब्दिक त्रास देण्याचे प्रकार घडतात. अशा अनेक घटना घडत असल्या तरी डॉक्टरांकडून तक्रारी केल्या जात नसल्याने त्या समोर येत नाहीत. डॉक्टरांकडून प्रश्नावली भरून घेतल्यानंतर घटनांचे प्रमाण, वेळ, कारणे, ठिकाणे याची माहिती एकत्रित केली जाईल. त्यातून हल्ल्यांसंदर्भातील देशातील वास्तव पुढे येईल. आयएमएच्या सुमारे साडेतीन लाख सदस्यांकडून माहिती संकलित केली जाणार आहे.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट.