बिहारमधील भागलपूर येथील नवगछिया येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक एक कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम पाहिल्यानंतर शेतकऱ्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. बँकेने त्यांचं अकाऊंट फ्रीज केलं. मंगळवारी सकाळी शेतकऱ्याने स्वत: सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवगछियाच्या गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिया गावात राहणारे 75 वर्षीय शेतकरी संदीप मंडल यांचं एसबीआयमध्ये खातं आहे. त्यांनी सांगितलं की, 26 डिसेंबर रोजी त्यांनी मुलाला पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवलं होतं.
बँकेत पोहोचल्यावर मुलाला समजलं की कुठून तरी त्यांच्या खात्यात एक कोटी रुपये आले आहेत. यामुळे खातं फ्रीज करण्यात आलं. यानंतर मुलाने घरी येऊन मला माहिती दिली. मी बँकेत पोहोचलो आणि बँक मॅनेजरकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करा, असं सांगितलं. तिथून रिपोर्ट येईल, मग खातं अनफ्रीज होईल.
शेतकरी संदीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसबीआय खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम येते. संदीप मंडल म्हणाले की, पैसे कोठून आले याची मला कल्पना नाही. आम्ही शेती करतो. मला याबद्दल माहिती नाही. मी ऑगस्ट महिन्यापासून माझे पासबुक अपडेट केले नव्हते. माझ्या खात्यात एकूण 8400 रुपये होते. बँक मॅनेजर म्हणाले की, सायबर पोलीस स्टेशनला जा, तिथून रिपोर्ट घ्या, मग खातं सुरू होईल.
डीएसपी सुनील कुमार पांडे यांनी सांगितलं की, संदीप मंडल नावाची एक व्यक्ती अर्ज घेऊन आली होती की, त्यांचं खातं फ्रीज करण्यात आलं आहे. चौकशी केली असता अंदाजे एक कोटी रुपये खात्यात आल्याचं आढळून आलं. याप्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बँकेला नोटीस मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तेलंगणा पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू.