Punjab Election : जवळचे मित्र ते राजकीय शत्रू... विक्रमसिंग मजीठिया व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात चुरशीची लढत; अमृतसर पूर्व जागेचे काय आहे समीकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:40 PM2022-01-27T14:40:40+5:302022-01-27T14:51:55+5:30
Punjab Election : निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत.
चंदिगड : पंजाबमधील यंदाची विधानसभा निवडणूक खूपच चर्चेत असणार आहे. काँग्रेस अंतर्गत वादासह निडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तर भाजपासोबत असलेल्या अकाली दलाने बसपासोबत हातमिळवणी केली आहे. याशिवाय, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला असून ते भाजपा आघाडीत निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पार्टी एकटीच निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, या निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत.
अकाली दलाने पार्टीचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग मजीठिया यांना काँग्रेसच्या पंजाब युनिटचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विक्रमसिंग मजीठिया आणि नवज्योतसिंग सिद्धू हे एकेकाळी जवळचे मित्र होते. आज ते राजकीय शत्रू आहेत. या जागेवर दोघांमध्ये 'करो या मरो' अशी लढत होणार आहे.
विक्रमसिंग मजीठिया आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात अनेकवेळा जोरदार राजकीय वाद झाले आहेत. विक्रमसिंग मजीठिया यांनी दावा केला आहे की, अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योतसिंग सिद्धू यांचे डिपॉझिट जप्त केले जाईल. दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी 'आधी जामीन घ्या, मग डिपॉझिट जप्त करा' असे प्रत्त्युत्तर देत विक्रमसिंग मजीठिया यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू बनले होते गेम चेंजर
2017 मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी केवळ 42,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने भाजपाचे प्रतिस्पर्धी राजेश हनी यांचा पराभव केला नाही तर अमृतसर जिल्ह्यातील 11 पैकी 10 जागा जिंकून पक्षासाठी एक गेम चेंजरची भूमिका निभावली होती. अमृतसर हा एकेकाळी अकाली दल आणि भाजपा युतीचा बालेकिल्ला होता.
मजीठिया मतदारसंघ विक्रमसिंग मजीठिया यांच्या बालेकिल्ला
हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमध्ये शिकलेल्या विक्रमसिंग मजीठिया यांनी 2017 ची निवडणूक मजिठिया मतदारसंघातून जिंकली होती. 2012 मध्ये त्यांचा विजयी फरक 47,581 होता. 2017 मध्ये ते 22,884 मतांच्या फरकाने खाली आले. 2007 मध्येही त्यांनी ही जागा जिंकली होती. त्यांचे वडील सरदार सत्यजितसिंग मजिठिया हे माजी उप संरक्षण मंत्री होते.
अमृतसर पूर्व विधानसभेची कोणी, कधी जिंकली?
1951: सरूपसिंग, शिरोमणी अकाली दल
1957: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ
1962: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ
1967: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ
1969: ज्ञानचंद खरबंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1972: ज्ञानचंद खरबंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2012: नवज्योत कौर सिद्धू, भारतीय जनता पार्टी
2017: नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेस
2022 मधील अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवार
जीवनज्योत कौर, आप
नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेस
विक्रमसिंग मजिठिया, अकाली दल