नवजोत सिंग सिद्धू काँग्रेसमध्येच राहणार, मुख्यमंत्र्यांसोबत काही बाबींवर सहमती झाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 08:34 AM2021-10-01T08:34:58+5:302021-10-01T08:37:00+5:30
नवजोत सिंग सिद्धूंनी काल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेतली होती.
नवी दिल्ली: सध्या पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबवर सर्वांचीच नजर आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी काल झालेल्या बैठकीत काही नियुक्त्या मागे घेण्यास सहमती दर्शवली. यामुळे आता नवज्योतसिंग सिद्धूकाँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचं कळतंय.
नवीन मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारताच पंजाबमधील मंत्री, पोलीस प्रमुख आणि अॅटर्नी जनरल यांच्यासह प्रमुख नियुक्त्यांमुळे सिद्धू नाराज होते. पण, आता चन्नी यांनी सिद्धूंच्या किमान एका मागणीवर समती दर्शवली आहे. यानंतर सिद्धूंनीही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काही नियुक्त्यांवर सहमती दर्शवली. दरम्यान, पंजाबमधील आगामी निवडणुका पाहता आणि कारभाराला मजबूत आधार देण्यासाठी काँग्रेसने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Chief Minister has invited me for talks … will reciprocate by reaching Punjab Bhawan, Chandigarh at 3:00 PM today, he is welcome for any discussions !
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 30, 2021
चन्नी यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी सिद्धूंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असल्याची माहिती दिली होती, "मुख्यमंत्र्यांनी मला चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. पंजाब भवन, चंदीगड येथे आज दुपारी 3:00 वाजता बैठकीसाठी पोहोचेल. कोणत्याही चर्चेसाठी त्यांचे स्वागत आहे," असं सिद्दू आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
सिद्धूंचा काँग्रेसला धक्का
जुलै महिन्यात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवलेल्या सिद्धूंनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देत सिद्धूंनी "पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या हिताच्या अजेंड्याशी कधीही तडजोड करू शकत नाहीत,"असे म्हटले होते. सिद्धू यांचा राजीनामा गांधी कुटुंबासाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. कारण, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या जवळ मोठा राजकीय धोका पत्करून अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सिद्धूंचे समर्थन केले होते.