नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण तापले आहे. सर्व पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या सर्व गदारोळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांची बहीण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुमन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धूंनी त्यांच्या आईकडून संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांच्या आईला बेघर केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
चन्नी आणि सिद्धू यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केली जात असतानाच विधानसभा निवडणुकीपूर्वी बहिणीने घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. वडील भगवंत सिद्धू यांच्या निधनानंतर सिद्धूंनी आई निर्मल भगवंत आणि बहिणींना घरातून हाकलून लावले होते, असे सांगत सिद्धूची बहीण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
त्या म्हणाल्या की, सिद्धूंनी लोकांशी खोटे बोलले आहे. सिद्धू दोन वर्षांचे असताना त्यांचे पालक वेगळे झाले होते, हे सिद्धूंचे विधान साफ खोटं आहे. सुमन तूर यांनी सांगितले की, त्यांच्या आईचा दिल्ली रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत मृत्यू झाला होता. सुमन तूरने सांगितले की, त्या नवज्योत सिद्धू यांना त्यांच्या अमृतसर येथील घरी भेटायला गेल्या होत्या, पण सिद्धूंनी गेट उघडले नाही. त्यांचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.
मी आजही मेहनत घेत आहे
सुमनने पत्रकार परिषदेत सांगितले की, माझी आई आणि बहीण या जगात नाहीत, पण मी अजूनही जगण्यासाठी खूप मेहनत करत आहे. नवज्योत सिद्धूची सासू जसवीर कौर यांनी आमचे घर उद्ध्वस्त केले. मी माझ्या वडिलोपार्जित घरी कधीही जाऊ शकले नाही. सुमन तूर यांना जेव्हा विचारण्यात आले की, इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या वेळी त्या आरोप का करत आहेत, तेव्हा त्या म्हणाल्या की, मला नुकताच एक लेख दिसला, ज्यात नवज्योत सिद्धू यांनी आई आणि वडील वेगळे झाल्याचे आणि बहिणींशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. यामुळेच मी आता हे आरोप करत आहे, असे त्या म्हणाल्या.
जो स्वतःच्या कुटुंबाचा नाही झाला, तो दुसऱ्याचा काय होणार?
सुमन पुढे म्हणाल्या की, जे सिद्धू त्यांच्या कुटुंबाचे झाले नाहीत, ते दुसऱ्याचे काय होणार. पैशासाठी सिद्धूने आईला बेवारस सोडले. सिद्धूने कोट्यवधीची कमाई केली असली तरी तो कुटुंबाचा झाला नाही. सुमन म्हणाल्या की, त्यांनी सिद्धूंना बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण भावाने त्यांना ब्लॉक केले आहे.