सचिनच्या समर्थनार्थ नवनीत कौर, सेलिब्रिटींना जज करणारे 'देशविरोधी'
By महेश गलांडे | Published: February 11, 2021 11:44 AM2021-02-11T11:44:28+5:302021-02-11T11:45:09+5:30
सचिनसह इतरही सेलिब्रिटींच्या ट्विटचे समर्थन करताना, देशाची सार्वभौमत्वता आणि अखंडता याबद्दल बोलण्यात चुकीचं काय, असे म्हणत भाजपा नेत्यांनी समर्थन केले होते.
नवी दिल्ली - मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स चांगलेच खवळले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. सचिनच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. सचिनसह इतरही खेळाडू आणि सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं, या ट्विटला राजकीय वळण लागलं. त्यामुळे, सचिनसह सेलिब्रिटींवर टीका करण्यात आली. पण, भाजपा नेत्यांनी या सेलिब्रिटींचं समर्थन केलं.
सचिनसह इतरही सेलिब्रिटींच्या ट्विटचे समर्थन करताना, देशाची सार्वभौमत्वता आणि अखंडता याबद्दल बोलण्यात चुकीचं काय, असे म्हणत भाजपा नेत्यांनी समर्थन केले होते. आता, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनीही सचिनसह सेलिब्रिटींच्या ट्विटचं समर्थन केलंय. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनासाठी त्या दिल्लीत आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलंय. देशाचा अभिमान असलेले राष्ट्रीय नायक देशाच्या बाजून आहेत की विरोधात. हे इतर कुणीही सिद्ध करण्याची गरज नाही. या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या ट्विटवरुन या सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत, असे नवनीत कौर यांनी म्हटलं.
National heroes don't have to prove anyone whether they're in favour of the nation or against it. It's a democracy, we can express ourselves whenever we want. If someone is judging celebrities on basis of a tweet,then they're anti-India:Navneet Rana, MP from Amravati, Maharashtra pic.twitter.com/eIZC5Mfd5e
— ANI (@ANI) February 8, 2021
केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. केरळमधील कोची येथे हा प्रकार घडला होता. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे. याचदरम्यान सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, राज्य सरकारने सचिनसह देशातील सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्यावरुनही फडणवीस यांच्यासह भाजपा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. भारतरत्नांची चौकशी करणं महाविकास आघाडी सरकारलं शोभत नाही, असा शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली होती.
सचिनला पवारांचा सल्ला
सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर सर्वसामान्य नागरिक आणि नेटीझन्स आक्रमक झाले आहेत. त्यामुळे "आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.
सरकारने भारतरत्नांना ट्विट करायला लावण बरं नाही - राज ठाकरे
"कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही", असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. तसेच कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा, असं राज ठाकरे म्हणाले.
सचिन तेंडुलकरचं ट्विट
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं.