नौदलात लवकरच ५६ युद्धनौका, पाणबुड्यांचा होणार समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:18 AM2018-12-04T06:18:31+5:302018-12-04T06:18:38+5:30
नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या ५६ युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
नवी दिल्ली : नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या ५६ युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचाही समावेश करण्यात येईल, असे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी सोमवारी सांगितले. नौदल दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ३२ युद्धनौकांची बांधणी सुरू आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी २.५ लाख मच्छीमार बोटींवर आॅटोमेटेड आयडेंटिफिकेशन ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येत आहेत.
समुद्री गस्तीनौकांच्या बांधणीला विलंब झाल्याबद्दल रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग लिमिटेडवर नौदलाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, असे लांबा यांनी सांगितले. या प्रकल्पाला बँकेने दिलेल्या हमीची रक्कम नौदलाने स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाची नौदलाकडून चौकशी सुरू आहे. मात्र हा व्यवहार अद्याप रद्द झालेला नाही, असेही ते म्हणाले. मालदीवमध्ये भारताला अनुकूल असलेले सरकार आले असून दोन्ही देशांतील सागरी सुरक्षाविषयक सहकार्य वाढावे याचे प्रयत्न आहेत.
मुंबई हल्ल्याने आली जाग
२००८ साली दहशतवाद्यांनी मुंबईत घुसखोरी करून भीषण हल्ला चढविला होता. त्यामुळे देशाच्या सागरी सुरक्षेतील अनेक दोष ठळकपणे समोर आले होते. या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत लष्कर, नौदल, हवाई दलात नवी संरक्षणसामग्री समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.