Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा
By मुकेश चव्हाण | Published: February 9, 2021 04:16 PM2021-02-09T16:16:28+5:302021-02-09T16:26:43+5:30
ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलनजीवी अशी उपमा दिल्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, आजतर देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे, कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते. त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं.पण ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.
सरकारने देशातील दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे एक स्वप्न दाखविले होते.पण रोजगार मिळायचे लांबच राहिले जे हातातलं होतं ते देखील निसटून गेलं अशी स्थिती आहे. हजार जागांसाठी लाखो तरुण अर्ज करतात. चतुर्थश्रेणीच्या जागांसाठी ग्रॅज्युएट-पोस्टग्रॅज्युएट तरुण रांगेत उभे आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तसेच 'नीम' आणि 'नॅशनल अप्राईंटिस' यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरली आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते.यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या तरुणांचा आक्रोश समजून घ्या आणि या धोरणांचा पुनर्विचार करावा अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे. या अभिभाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला.जेंव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकले होते तेव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणातही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की, हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की 'मुठभर पुँजीपतीनिर्भर' भारताची, असा सवाल उपस्थित करत अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
तसेच जर अशा प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणाऱ्या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही, असा इशारा देखील अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
सभागृहात काही सदस्यांनी परदेशातील लोकांनी आपल्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे अभिमानाने सांगितलं.ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष संजीवनी म्हणतील तर आम्ही खुश होऊ,अमेरिकेचे माजी अध्यक्ष 'हाऊडी मोदी' म्हणतील तर आम्ही टाळ्या वाजवू. पण एखादा परदेशी व्यक्ती मानवतावादी दृष्टीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत एखादी टिपण्णी करीत असेल तर ती फॉरेन रिस्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते. हे बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. अमोल कोल्हेंनी सात मिनीटाच्या भाषणात आरोग्य व्यवस्था, युवकांचा रोजगार, सरकारचा खासगीकरणाचा सपाटा, प्रजासत्ताक दिनाचा हिंसाचार आणि शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केल्याने त्यांच्या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.