गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:11 PM2019-01-08T20:11:23+5:302019-01-08T20:16:07+5:30
धनगरांना आरक्षण कधी देणार; सुळेंचा सवाल
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मोदी सरकारनं आज लोकसभेत मांडलं. हे विधेयक जुमला ठरू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देते. मात्र हे विधेयक संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडण्यात आलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारनं गरीब सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक आणलं. मात्र हे आरक्षण निवडणुकीसाठीचा जुमला ठरू नये, असा चिमटा सुळेंनी काढला. हे विधेयक सरकारकडून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडलं गेलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी सरकारला धनगर आरक्षणाची आठवण करून दिली. महाराष्ट्रातला धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण कधी मिळणार, असा सवाल सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला. त्यावर या प्रकरणी सर्वेक्षण सुरू असल्याचं उत्तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिलं.
सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना रामविलास पासवान एका इंग्रजी म्हणीचा वापर केला. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, या म्हणीत पासवान यांनी थोडा बदल केला. 'मी रेल्वे मंत्री असताना आमच्या विभागात एक वाक्य गमतीनं वापरलं जायचं. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ रेल्वे; अँड व्हेअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे,' असं पासवान म्हणाले. त्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्यात सरकारचं विल म्हणजेच इच्छाशक्ती कमी पडते आहे का, असा प्रश्न सुळेंनी विचारला.