धक्कादायक! कोरोना कालावधीत ११,७१५ उद्योजकांच्या आत्महत्या; २०१९ च्या तुलनेत २९ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 01:11 PM2021-12-01T13:11:21+5:302021-12-01T13:12:45+5:30
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाचा जगाला मोठा तडाखा बसला. अद्यापही कोरोनाचे संकट कायम असून, अनेकविध नव्या व्हेरिएंटची भर पडत ...
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाचा जगाला मोठा तडाखा बसला. अद्यापही कोरोनाचे संकट कायम असून, अनेकविध नव्या व्हेरिएंटची भर पडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात तर कोरोना संकटाचा प्रचंड मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसल्याचे दिसले. हजारो उद्योग कायमचे बंद पडले, तर लाखो लोकांचे रोजगार गेले. यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने एनसीआरबीच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सन २०२० मधील कोरोना संकट काळात कृषी क्षेत्रापेक्षाही उद्योग क्षेत्राला जास्त फटका बसल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाउन यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली. २०१९ च्या तुलनेत म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या कालावधीची तुलना केल्यास ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या करत जीवन संपवले
गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) डेटाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये ९ हजार ०५२ उद्योजकांनी आत्महत्या केली. तर २०२० मध्ये ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केली. उद्योजकांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा हा शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. २०२० मध्ये १० हजार ६६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. उद्योजकांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत कृषी क्षेत्राशी तुलना करता २९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सन २०२० मध्ये आत्महत्या केलेल्या ११ हजार ७१६ उद्योजकांपैकी ४ हजार २२६ दुकानदार, ४ हजार ३५६ व्यापारी आणि ३ हजार १३४ जण इतर व्यवसायात गुंतलेले होते, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील बँकामधील निष्क्रिय खाती आणि यामधील रकमेसंदर्भात माहिती दिली. देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ हजार कोटी रुपये पडून असून, यापैकी ९ कोटी अशी खाती आहेत, ज्यामध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने एका वर्षांहून अधिक निष्क्रिय किंवा कोणताही व्यवहार झालेल्या खात्यांचे दरवर्षी मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच खात्यांच्या निष्क्रियतेबाबत खातेधारकांकडून माहिती मागवण्यासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.