एनडीएचा मृत्यू झालाय, एनडीएचे अस्तित्व केवळ कागदावरच - संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 02:20 PM2017-09-03T14:20:47+5:302017-09-03T14:53:22+5:30
आज झालेल्या मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेसह एनडीएच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचा संताप अनावर झाला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई, दि. 3 - आज झालेल्या मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेसह एनडीएच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचा संताप अनावर झाला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची हत्या झाली आहे. तिचे अस्तित्व आता केवळ कागदावर उरले आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.
आज झालेल्या मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र
'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं सोडाच; साधी विचारणाही न झाल्यानं शिवसेना प्रचंड संतापली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे,' अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतानात संजय राऊत म्हणाले," एनडीएबाबत आता फार काही विचारू नका. एनडीएची हत्या झाली आहे. एनडीए आता केवळ कागदोपत्री उरली आले. आता केवळ बैठकांपुरते तिचे अस्तित्व उरले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि अधिवेशनापुरती भाजपाला एनडीएची आठवण येते."
आज भाजपाकडे 282 जागा आहेत. त्याच जर 240 असत्या तर भाजपाला घटक पक्षांचे महत्त्व कळले असते, त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत नसते तर ते मुंबई, हैदराबामध्ये आमंत्रणे घेऊन फिरले असते, असेही ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला. शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील मतभेत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली . तसेच मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चौबे (बिहार), वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश) शिवप्रताप शुक्ल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्याबरोबरच गजेंद्रसिह शेखावत, मुंबईचे माजी पोलीस प्रमुख सत्यपाल सिंह आणि कन्ननथनम अल्फोन्स हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह आणि माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.