नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आयोजित केलेल्या शाही मेजवानीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यास बेपर्वाई दाखविल्याने सदनाच्या संपर्काधिकारी संध्या पवार यांची बदली करण्यात आली. २५ जानेवारी रोजी ओबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनातील मेजवानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. १७ जानेवारीला राष्ट्रपती भवनातून आलेले निमंत्रण मुख्यमंत्र्यांना मिळू शकले नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहता आले नव्हते. या प्रकरणी पवार यांना जबाबदार धरून त्यांची बदली करण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू असून,काही वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. पण प्रथम पवार यांची बदली मुंबईत करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. निमंत्रणाचे फॅक्स मुख्यमंत्री कार्यालयात केल्यावर मूळ निमंत्रणही मुख्यमंत्री कार्यालयास पाठविल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क करून कळविण्याची जबाबदारी सदनाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांची असते. या प्रकरणी अप्र निवासी आयुक्त समीर सहाय यांचे पुढे आले आहे. त्यांनी फोन करून मुख्यमंत्री कार्यालयास सांगणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी पवार यांना लेखी विचारणा केल्यावर त्यांची बदली करण्याचा निर्णय शुक्ला यांनी घेतला. त्या मागील वर्षी मे महिन्यात दोन वर्षाच्या नियुक्तीवर आल्या होत्या. अवघ्या नऊ महिन्यात मूळ जागी बदली करण्यात आली. यापूर्वी बहुचर्चित चपाती प्रकरणी सदनाचे तेव्हाचे व्यवस्थापक सुहास ममदापूरकर यांची नियुक्तीनंतर दोन महिन्याच्या आत बदली केली होती. त्यापूर्वी मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री व एका कॅबिनेट मंत्र्यांच्या भोजनासाठी मांसाहार कमी पडला म्हणून अरूण कालगावकर या सहायक व्यवस्थापकास निलंबित कण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी कनिष्ठांचा बळी देण्याची निती याप्रकरणीही सरकारने कायम ठेवल्याचे दिसून येते.
बेपर्वाई भोवली...!
By admin | Published: January 31, 2015 2:01 AM