प्रयागराज : देशाच्या न्य़ायव्यवस्थेवर दबाव आणला जात असून याबाबत देशाला आणि तरुणांना सावध करण्याची वेळ आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. मोदी यांनी प्रयागराजमध्ये कुंभच्या यशस्वी आयोजनाबद्दल गंगेच्या किनाऱ्यावर पूजा केली. यानंतर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी सभेला संबोधित केले.
प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली. यावेळी त्यांनी देशाला सावध करत असल्याचेही सांगितले. सर्वाधिक वेळ सत्तेत राहिलेला पक्ष आज देशाच्या स्वायत्त संस्थांना एका पक्षाच्या समोर हात जोडून उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हा पक्ष सर्व मर्यादा सोडून आहे. न्यायव्यवस्थेला सत्तेत राहून लटकवत ठेवतात आणि सत्ता गेली धमकावण्याचे काम करतात. केशवानंद प्रकरणात सर्वाच वरिष्ठ न्यायाधीशांना सरन्यायाधीश बनविण्यात आले नाही. न्य़ायाधीश खन्ना यांच्या ज्येष्ठतेकडे डोळेझाक करण्यात आल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
हा पक्ष स्व:ताला देशाच्या, लोकशाहीच्या आणि इतर संस्थांच्या वरचे असल्याचे समजतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे दुसरे उदाहरण पाहिले. अशा व्यक्ती, पक्षापासून सावध राहायला हवे, असेही मोदी यांनी सांगितले.
मोदी यांनी जवळपास साडेचार हजार कोटींच्या योजनांचे भूमीपूजन केले. यामध्ये कुंभसाठी येणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधा मिळतील. शिवाय देशातील विविध भागातून हवाई प्रवास करता येण्यासाठी प्रयत्नही करण्यात येणार आहेत. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकल्पांचाही यामध्ये समावेश आहे.