पानीपत - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा याची तब्येत अचानक बिघडली आहे. पदक जिंकल्यानंतर १० दिवसांनी नीरज पानीपतला पोहचला. समालखा येथील हल्दाना बॉर्डरवरून त्याची रॅली काढण्यात आली. ही यात्रा त्याच्या मूळ गावी खंडारा येथे पोहचली. खंडारा येथे नीरजच्या स्वागतार्थ कार्यक्रम सुरु असताना नीरजची तब्येत अचानक बिघडली त्याला व्यासपीठाच्या मागे आणण्यात आलं.
अचानक तब्येत बिघडल्यानंतर नीरज चोप्राला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ३ दिवसांपूर्वी नीरजला ताप आला होता. त्यामुळे त्याची कोविड चाचणी करण्यात आली. सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली. त्यानतंर आज त्याच्या मूळगावी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतु लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर हा कार्यक्रम लवकर आटोपला. भालाफेक स्पर्धेतील खेळाडू नीरज चोप्रा याला अतिताप आणि गळा खराब असल्याने हरियाणा सरकारच्या सन्मान समारंभात सहभागी होता आले नाही.
सध्या नीरज चोप्राची तब्येत ठीक असून त्यांना आरामाची गरज असल्याचं डॉ. सुशील सारवान यांनी सांगितले. सकाळपासून वारंवार प्रवास आणि गर्दीमुळे नीरजला अस्वस्थ जाणवू लागलं. काही वेळ त्याने आराम केल्यानंतर आता त्याची तब्येत सुधारत आहे. नीरजला भेटण्याची कुणालाही परवानगी दिली जात नाही असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर लांबीवर भाला फेकून सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं.(Win an athletics gold medal at the Olympics) तर रौप्य आणि कांस्य पदकावर चेक रिपब्लिकच्या खेळाडूंनी कब्जा मिळवला होता. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भालाफेकपटूंच्या क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर होता. पण आता सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर नीरजनं थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.