मुंबई : महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. सीआरपीसीच्या कलम ८२ अन्वये ही कारवाई करण्यात आली.हिऱ्यांच्या आयात व निर्यातीचा व्यापार करणा-या नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल, राडाशीरज्वेलरी कंपनी या कंपन्यांच्या माध्यमातून हि-यांवरील आवश्यक कर न भरता व्यापार केला जात असल्याचे प्रकरण डीआरआयच्या मुंबई विभागाच्या पथकाने डिसेंबर २०१४ मध्ये उघडकीस आणले होते. सुरतच्या विशेष आर्थिक विभागात असलेल्या मोदीच्या या कंपन्यांद्वारे हा गैरव्यवहार सुरू होता. डीआरआयतर्फे याचा तपास सुरू होता.निर्यात करण्यासाठी हिरे आणताना त्यावरील आयात कर व इतर करांमध्ये सवलत दिली जात असताना याद्वारे आणले गेलेले हिरे स्थानिक बाजारपेठेत विक्री केले जात असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार करण्यात आली होती. सीमाशुल्क विभागाचा थकवलेला कर व दंडापोटी कंपनीला ४८ कोटी २१ लाख रुपये भरावेलागले होते. या वेळी केलेल्या तपासणीत हाँगकाँग व दुबईला पाठवण्यासाठी तयार करून सहार कार्गो करण्यात आलेल्या सामानाची पाहणी करण्यात आली त्यामध्ये अनेक बाबींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर करचुकवेगिरी केल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधात सीमाशुल्क कायद्याच्या कलम १३२, १३५, १४० व भादंविच्या १२० बी अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.२२ जून २०१८ ला मोदीविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र, तो न सापडल्याने प्रक्रियेनंतर त्याला फरार घोषित करण्यातआले. या निर्णयामुळे मोदीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया आता डीआरआयला सुरू करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रकरणात नीरव मोदी फरार घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:06 AM