काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही नेहरूंची हिमालयापेक्षा मोठी चूक - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:44 AM2019-09-30T04:44:14+5:302019-09-30T04:44:39+5:30
काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. तथापि, काश्मीरमध्ये निर्बंध आहेत कुठे? ते तर तुमच्या मनात आहेत, असा टोला अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना रविवारी लगावला आहे.
३७० कलम रद्द करण्याचा निर्णय व काश्मीर या विषयावर माजी सनदी अधिकाऱ्यांच्या संकल्प या संस्थेने दिल्लीतील नेहरू स्मृती वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयामध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. संकल्प ही रा. स्व. संघ परिवारातील एक संघटना आहे. अमित शहा म्हणाले की, दोन्ही देशाशी संबंधित प्रश्नावर संयुक्त राष्ट्रात जाण्याचा नेहरु यांचा व्यक्तीगत निर्णय चूकच होती. तेथेही काश्मिर वादग्रस्त क्षेत्रासारखे सादर करण्यात आले. देशाच्या या भागाला पाकिस्तानकडून कब्जा केल्या गेल्याच्या स्वरुपात मांडले असते तर आज याच्या मालकीहक्कावरुन वाद झाला नसता. अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये निर्बंध असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेणे ही हिमालयापेक्षा मोठी चूक होती. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे अतिशय योग्य निर्णय आहेत.
काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभाग
अमित शहा म्हणाले की, ३७० कलमामुळे बालविवाहविरोधी कायदा काश्मीरमध्ये लागू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे तिथे आठ-दहा वर्षांच्या मुलींचे विवाहही बिनदिक्कतपणे करण्यात येत. ३७० कलमामुळे १०६ केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करता येत नव्हते. हे कलम रद्द केल्यानंतरच काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभाग स्थापन करणे शक्य झाले आहे.