नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केले. इस्रायलचे पंतप्रधान १५ वर्षांनी भारतात आले आहेत. नेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत टिष्ट्वट केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.यंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे २५ वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी छाबाड हाऊसमध्ये आई-वडील मारले गेल्याने अनाथ झालेला मोशे हर्ट्झबर्ग हा मुलगाही नेतन्याहू यांच्यासोबत आला आहे. तो मंगळवारी मुंबईला येईल व छाबाड हाऊसला भेट देईल.‘तीन मूर्ती चौक’आता ‘तीन मूर्ती हैफा चौक’भारत-इस्रायल मैत्रीचे प्रतीक म्हणून दिल्लीतील ‘तीन मूर्ती चौक’चे नाव ‘तीन मूर्ती हैफा चौक’ असे बदलण्यात आले. मोदी व नेतान्याहू यांनी या चौकात असलेल्या स्मारकास भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत आम्ही बहादूर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत असल्याचे मोदी म्हणाले. नि:स्वार्थ बलिदान आणि तपस्या यांच्या महान परंपरेला सलाम, अशा शब्दात मोदी यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये भावना व्यक्त केल्या. कास्यच्या या तीन मूर्ती हैदराबाद, जोधपूर आणि म्हैसूर सैनिकांचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्या महायुद्धात २३ डिसेंबर १९१८ मध्ये या सैनिकांनी हैफा शहर जिंकून दिले होते.
राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केले नेतन्याहूंचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:49 AM