BBC Documentry : गुजरात दंगलीशी संबंधित बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) डॉक्युमेंटरी 'इंडिया: द मोदी क्वेश्चन'च्या वादावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांच्या मुलाने वेगळीच भूमिका घेतली आहे. माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांचा मुलगा आणि KPCC डिजिटल मीडिया सेलचे निमंत्रक अनिल के अँटोनी यांनी ट्विट केले की, 'भारतीय संस्थांनी बीबीसीच्या गोष्टींना प्राधान्य देणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे.
काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य अनिल के अँटनी म्हणाले की, 'अशाप्रकारचे माहितीपट एक धोकादायक उदाहरण प्रस्थापित करतात आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला खीळ घालतात. भारतीय जनता पक्षासोबत मतभेद असू शकतात, परंतु अशी मते ठेवून एक धोकादायक उदाहरण मांडले जात आहे.' त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये अँटोनी यांनी जॅक स्ट्रॉ यांचाही उल्लेख करत त्यांना इराक युद्धामागचा मुख्य व्यक्ती म्हटले आहे.
जॅक स्ट्रॉ कोण आहे?अनिल अँटनी यांनी आपल्या ट्विटमध्ये ज्या जॅक स्ट्रॉबद्दल बोलले आहे ते ब्रिटिश राजकारणी आहेत. टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राउन यांच्या सरकारमध्ये ते 1997 ते 2010 पर्यंत कॅबिनेट मंत्री होते. जॅक स्ट्रॉने इराकवर आक्रमण करण्याच्या योजनेवर सही केली असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. इराक युद्धामागे त्यांचा मेंदू असल्याचे म्हटले जाते.
ए के अँटोनी यांच्या मुलाचे हे ट्विट अशा वेळी आले आहे, जेव्हा केरळमधील अनेक राजकीय पक्षांनी, काँग्रेससह बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून त्यावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ची विद्यार्थी शाखेने मंगळवारी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबत घोषणा केली आहे.
अशाच घोषणा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या विविध घटकांनी केल्या आहेत, ज्यात CPI(M) संलग्न डाव्या विद्यार्थी संघटना SFI आणि युवक काँग्रेस यांचा समावेश आहे. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या अल्पसंख्याक सेलने सांगितले की, प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये डॉक्युमेंटरी दाखवली जाईल.