सेल्फी जिवावर बेतला; दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवरून बाईक खाली कोसळून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:56 AM2018-11-23T10:56:48+5:302018-11-23T11:04:36+5:30
राजधानी नवी दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही बाईकस्वार ब्रिजवरुन जात असताना सेल्फी घेत होते. बाईक चालवताना सेल्फी घेणं दोघांच्याही जिवावर बेतले. सेल्फी घेत असताना त्यांची बाईक दुभाजकाला धडकली आणि दोघंही वाहनासहीत पुलावरुन खाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी तरुणांची बाईक धडकली, तेथे एक मोठी मोकळी जागा असल्याची माहिती समोर आली आहे. या मोकळ्या जागेमुळे त्यांची बाईक पुलावर खाली कोसळली. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या पुलाचं लोकार्पण केले होते.
Delhi: Two bike-borne persons died when they fell off their motorcycle after it rammed into a divider at Signature Bridge, earlier this morning.
— ANI (@ANI) November 23, 2018
सर्वाधिक उंच सेल्फी पॉईंट हेच या ब्रिजचे वैशिष्ट्य आहे. ज्या दिवशी हा ब्रिज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला, तेव्हापासून ते आजपर्यंत लोकांकडून जीव धोक्यात घालून येथे सेल्फी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. पण हे प्रकरण आता पोलिसांसमोर एक आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.