नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेतील पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहेय. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आणि लोकसभा अध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अभिभाषण केले. त्यावेळी, सर्व नवनिर्वाचित खासदार, मंत्रीमंडळ आणि लोकसभा अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच, देशाच्या प्रगतीबद्दल सांगताना जनतेनं स्थीर सरकार दिल्याचंही कोविंद म्हणाले. तसेच शेतात राबणार शेतकरी आणि सैन्यातील जवानांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचं लक्ष असून सैन्यातील जवानांच्या कुटुबीयांकडे सरकार जातीने लक्ष देईल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले. तसेच एक देश एक निवडणूक याबाबतही राष्ट्रपती महोदयांनी चर्चा केली. देशात सतत कुठे न कुठे निवडणूक होतच असते. त्यामुळे, देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. एक देश एक निवडणूक झाल्यास देशातील सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या परीने, आपल्या प्रांतात मोठ्या प्रमाणात विकास साधतील. एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.
सीमारेषेवरील दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच, सरकारने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन देशाची क्षमता जगाला दाखवून दिली आहे. भविष्यातही देशाच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलण्यात येईल, असे कोविंद यांनी म्हटले.