नवी दिल्ली : देशातील पहिल्या रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या ट्रेनची नावे काय असतील, यावरून आता पडदा उठला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणजेच उद्या ज्या देशाच्या रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या ट्रेनचे उद्घाटन करतील, ती 'नमो भारत' म्हणून ओळखली जाणार आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारताच्या पहिल्या रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) कॉरिडॉरचा प्राधान्य विभाग २१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, नवीन 'रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम' (आरआरटीएस) ट्रेन्स 'नमो भारत' म्हणून ओळखल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आरआरटीएसच्या प्राधान्य विभागाचे उद्घाटन करणार आहेत. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा १७ किमी लांबीचा प्राधान्य विभाग त्याच्या उद्घाटनानंतर २१ ऑक्टोबर रोजी प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
पीएमओ बुधवारी सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आरआरटीएस सुरू करणारी साहिबााबाद आणि दुहाई डेपोला जोडणाऱ्या रॅपिडएक्स ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच, दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा १७ किमीचा प्राधान्य विभाग साहिबााबाद ते दुहाई डेपोला गाझियाबाद, गुलधर आणि दुहाई स्टेशनद्वारे जोडेल, असे पीएमओने म्हटले होते.
निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ मार्च २०१९ रोजी दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरची पायाभरणी केली होती. नवीन जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, आरआरटीएस प्रकल्प विकसित केला जात आहे. आरआरटीएस १८० किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने एक नवीन रेल्वे-आधारित, उच्च-गती, उच्च-फ्रिक्वेंसीसह प्रादेशिक प्रवासाची सुविधा देणारी एक प्रणाली आहे.
याचबरोबर, पीएमओने म्हटले आहे की, हा एक 'परिवर्तनकारी' प्रादेशिक विकास उपक्रम आहे, ज्यामध्ये आंतर-शहरी प्रवासासाठी दर १५ मिनिटांनी हाय-स्पीड ट्रेन उपलब्ध असतील आणि गरजेनुसार, दर पाच मिनिटांनी उपलब्ध असतील. तसेच, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एकूण आठ आरआरटीएस कॉरिडॉर असणार आहेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन कॉरिडॉर दिल्ली-गाझियाबाद-मेरठ, दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर आणि दिल्ली- पानिपतच्या अंमलबजावणीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगण्यात येते.