कुपोषणावर मात करणारे तांदळाचे जस्तयुक्त नवे वाण

By admin | Published: May 23, 2015 12:03 AM2015-05-23T00:03:01+5:302015-05-23T00:03:01+5:30

वैज्ञानिकांनी जस्ताचा (झिंक) समावेश असलेले नवे प्रोटीनयुक्त तांदळाचे वाण विकसित केले

New varieties of rice that overcome malnutrition | कुपोषणावर मात करणारे तांदळाचे जस्तयुक्त नवे वाण

कुपोषणावर मात करणारे तांदळाचे जस्तयुक्त नवे वाण

Next

रायपूर : वैज्ञानिकांनी जस्ताचा (झिंक) समावेश असलेले नवे प्रोटीनयुक्त तांदळाचे वाण विकसित केले असून, आदिवासीबहुल छत्तीसगडमध्ये कुपोषणावर मात करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा करण्यात आला आहे. या राज्यात सुमारे सात लाख मुले कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत.
‘छत्तीसगड झिंक राईस-१’ या नावाचे जस्त या जीवनसत्त्वाचा समावेश असलेले हे वाण देशात पहिल्यांदाच विकसित करण्यात आले आहे. पिकाचे वाण जारी करणाऱ्या राज्य समितीने मार्चमध्ये या तांदळाच्या उत्पादनाला हिरवी झेंडी दिली. पुढील खरीप हंगामात या तांदळाचे उत्पादन घेणे सुरू होईल.
रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील प्रो. गिरीश चंदेल यांच्या नेतृत्वातील वैज्ञानिकांच्या चमूने अति उच्च जस्तयुक्त तांदळाचे दोन वाण विकसित केले असून, त्यापैकी एक वाण जारी करण्यात आले. उपासमार संपविण्यासाठी देशात हरित क्रांतीची संकल्पना आणली गेली तेव्हापासून आम्ही पिकांच्या उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केल्याने उत्पादन वाढले. मात्र, पिकांची गुणवत्ता वाढलेली नाही. २००० मध्ये केंद्र सरकारने आरोग्य संघटनांच्या साह्याने सर्वेक्षण पार पाडले असता ६० ते ७० टक्के लोकसंख्या कुपोषणाची शिकार असल्याचे आढळून आले. लोह, जस्त आणि अ जीवनसत्त्वाची कमतरता हेच कुपोषणाचे कारण ठरते. त्यानंतर सरकारने विविध राज्यांमध्ये तांदूळ, गहू आणि मक्याच्या वाणावर संशोधन करून गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला, अशी माहिती त्यांनी दिली.
असा राहिला विकासाचा पल्ला...
छत्तीसगड हे तांदळाच्या उत्पादनासाठी ओळखले जात असून तेथे तांदळाचा ‘बायो फोर्टिफिकेशन’ संशोधन प्रकल्प अस्तित्वात आला. २००३-०५ या काळात पोषक घटक असलेल्या तांदळाची केवळ २०० ओळींची रोवणी करण्यात आली होती, मात्र उत्पादन अतिशय कमी झाले. २००६-११ या काळात बियाणे वाढविण्यात आले. गुणवत्तेसह उत्पादन वाढीवर भर देण्यात आला. त्यातून जस्तसमृद्ध असे ७ वाण विकसित झाले. २०१३ मध्ये केंद्र सरकारने हैदराबाद येथे तांदूळ संशोधन महासंचालनालयाच्या समन्वयातून (डीडीआर) वेगळी मोहीम राबवत देशाच्या विविध भागात उत्पादनाबाबत चाचण्या पार पाडण्यात आल्या. अखेर छत्तीसगडमध्ये अतिशय गुणवत्ता असलेले चार वाण विकसित करण्यात यश आले, अशी माहितीही प्रो. चंदेल यांनी दिली. (वृत्तसंस्था)




सध्या नव्या वाणाचे शंभर किलो बियाण्यांची १० एकरमध्ये रोवणी केली जाणार असून नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप केले जाईल. पुढील खरीप हंगामात व्यापक प्रमाणात रोवणी सुरू करता येईल, अशी माहितीही प्रो. चंदेल यांनी दिली.


गर्भवतींसाठी लाभदायक
४नव्या तांदळाचे वाण केवळ कुपोषणावर मात करण्यासाठीच उपयोगी ठरणार नाही, तर गर्भवती महिलांना पोषक घटकांचा मोठा स्रोत म्हणून त्याचा वापर करता येईल. अनेक सरकारी योजनांसह विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन योजनेतही त्याचा समावेश करण्याची योजना आहे. रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जस्त आणि लोहयुक्त पिकांचे वाण विकसित करण्याची गरज आहे, असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. अरुणा पाल्ता यांनी म्हटले.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप
सध्या नव्या वाणाचे शंभर किलो बियाण्यांची १० एकरमध्ये रोवणी केली जाणार असून, नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप केले जाईल. पुढील खरीप हंगामात व्यापक प्रमाणात रोवणी सुरू करता येईल, अशी माहितीही प्रो. चंदेल यांनी दिली.

Web Title: New varieties of rice that overcome malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.