नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:32 PM2022-05-23T17:32:35+5:302022-05-23T17:36:25+5:30
आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे.
आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. जन्म घेताच बालकाचा एक हेल्थ आयडी तयार करण्यात येईल. यातून बालकाचे पालक आपल्या मुलाच्या आरोग्याचा रेकॉर्ड ट्रॅक करू शकणार आहेत. यासोबतच आपल्या मुलाला कोणत्याही डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल किंवा रुग्णालयात न्यायचं असेल तर हेल्थ आयडीमुळे अनेक प्रकार मदत प्राप्त होऊ शकणार आहे. नॅशनल हेल्थ मिशन लहान मुलांचा हेल्थ आयडी तयार करण्याच्या मॅकेनिझमवर काम करत आहे. नवी प्रणाली अंमलात आणली गेली की आई-वडील आपल्या नवजात बालकाचा हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत.
आयुष्मान भारत अकाऊंट नंबर तयार करण्यात आल्यानंतर आई-वडील आपल्या मुलाचं हेल्थ रेकॉर्ड त्याच्या जन्मावेळीच अपलोड करू शकणार आहेत. हेल्थ आयडीसोबतच आणखी अनेक सुविधा या माध्यमातून मिळवता येणार आहेत. जसं की बालकाला कोणकोणत्या आयोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्याच्या नावे कोणती इन्श्युरन्स स्कीम आहे आणि संबंधित बालकावर खासगी किंवा सरकारी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे उपचार झाले आहेत या सर्व बाबी हेल्थ अकाऊंटवर अपडेट करता येणार आहेत. सध्या फक्त १८ वर्षांवरील व्यक्तींनात आयुष्मान भारत अकाऊंट नंबर बनवता येतो. पण नव्या नियमानुसार नवजात बालकांचंही आयुष्मान भारत हेल्थ आयडी तयार करता येणार आहे.
बालकांच्या हेल्थ आयडीचा फायदा काय?
एका सरकारी अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आई-वडीलांना आपल्या पाल्याच्या जन्मापासूनच त्याचा हेल्थ रेकॉर्ड ट्रॅक करता यावा आणि आरोग्य सुविधा पाल्याच्या जन्मापासूनच मिळायला हव्यात यासाठी हेल्थ आयडी फायदेशीर ठरणार आहे. जेव्हा कोणताही नवजात बालकाचा जन्म होतो तेव्हा त्याचा कोणताही आयडी नसतो. तसंच कोणताही अधिकृत कागदोपत्री पुरावा देखील नसतो. नवजात बालकाच्या जन्म प्रमाणपत्र बनविण्यासाठी देखील ३० दिवसांचा वेळ जातो. आता आई-वडील आपल्या हेल्थ आयडीला आपल्या नवजात बालकाच्या आयडीशी लिंक करू शकणार आहेत. यात जन्मावेळी आपल्या बालकाची हेल्थ हिस्ट्री पालकांना पाहता येणार आहे. भविष्यात वैद्यकिय उपचारांसाठी या माहितीचा खूप फायदा होऊ शकणार आहे.
हेल्थ आयडी कसा बनणार?
नवजात बालकाचा आयडी त्याच्या आई-वडीलांच्या हेल्थ आयडशी लिंक असणार आहे. यात आई-वडील आपल्या मुलाचं हेल्थ आयडी पाहू शकतील किंवा इतर कुणाला दाखवायचं असेल तर त्याची अनुमती तेच देऊ शकतील. मुल जोवर १८ वर्षांचं होत नाही तोवर त्याचा हेल्थ आयडी आई-वडिलांच्या अकाऊंटशीच लिंक राहील. नॅशनल हेल्थ मिशनच्या या नव्या प्रोजेक्टवर येत्या काही महिन्यात काम सुरू केलं जाणार आहे. आई-वडील विविध माध्यमातून हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत. यासाठी आयुष्मान भारत डिजीटल मिशन वेबसाईट, आयुष्मान भारत योजनेशी निगडीत रुग्णालयं, आरोग्य सेतू मोबाइल अॅप, पेटीएम अॅप, हेल्थकेअर प्रोव्हाडर आणि सरकारी हेल्थ स्कीमची मदत घेतली जाणार आहे. यांच्या माध्यमातून हेल्थ आयडी तयार करता येणार आहे.