तंजावूर : घराच्या छपरावरील कौले हटवून माकडांच्या टोळीने आत प्रवेश करत, आठ दिवसांच्या दोन लहान मुलींना पळवून नेल्याची खळबळजनक घटना तामिळनाडूच्या तंजावूरमध्ये शनिवारी सकाळी घडली. यातील एका आठ दिवसांच्या बाळाला माकडांनी जवळच्या सरोवरात फेकले. यात या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेने अवघे गाव हळहळले. सकाळची वेळ. घाईगडबडीची आणि घरातील कामे उरकण्याची. तामिळनाडूतील तंजावूरमध्ये एका छोट्याशा घरात आठ दिवसांच्या जुळ्या मुली घरातच शेजारी झोपलेल्या होत्या. त्यांची आई वॉशरूममध्ये गेली होती. याच वेळी माकडांची एक टोळी आली आणि त्यांनी छपरावरील कौले हटवून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या दोन लहान मुलींना उचलून ही माकडे पळाली, तोपर्यंत त्यांची आई भुवनेश्वरी या बाहेर आल्या, पण जागेवर मुली नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमा झाले. शोधाशोध केली, तर टेरेसवर एक मुलगी या लोकांनी माकडांच्या तावडीतून सोडविली, पण दुसरी आठ दिवसांची मुलगी कोठेच सापडत नव्हती.
आठ दिवसांतच आनंदावर विरजणपरिसरातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा दुसरी लहान मुलगी जवळच्याच सरोवरात आढळून आली. त्यानंतर, पोलीसही दाखल झाले. भुवनेश्वरी आणि राजा यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. ६ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वरी यांना जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना, माकडांच्या या उच्छादाने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान, वन विभागाने या माकडांना पिंजऱ्यात बंद करण्यासाठी एक पथक नेमले आहे.