दुसऱ्या दिवशीही राज्यसभेचे कामकाज गोंधळात तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:19 AM2020-03-04T04:19:35+5:302020-03-04T04:19:46+5:30
या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली;
नवी दिल्ली : अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना राज्यसभेत कागदपत्रे मांडू देण्यास काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतल्याने मंगळवारी राज्यसभेत गोंधळ सुरू झाला. या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली; पण लगेच चर्चा करावी, ही मागणी मान्य न झाल्याने गोंधळ सुरूच राहिला. परिणामी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
अनुराग ठाकूर प्रकरणातील गदारोळानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हाही गोंधळ सुरू झाला. आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी कागदपत्रे सभागृहात मांडल्यानंतर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी कागदपत्रे मांडण्यास सुरुवात केली. ते उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात ‘गोली मारो’चे प्रक्षोभक विधान केले होते.
काँग्रेसचे सगळे सदस्य उभे राहून ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत होते. काँग्रेसला द्रमुकच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
>लोकसभेतही गदारोळ
दिल्लीतील हिंसाचारावरून लोकसभेत दुसºया दिवशी मंगळवारीही गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत सभागृहाचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर सभापतींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विधेयक सादर करण्यास सांगितले.
संपूर्ण विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करीत होते आणि दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी करीत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करीत होते. विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती आणि त्यांनी काही कागद फाडले. तरीही सभापतींनी कामकाज सुरूच ठेवले. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी सभापतींच्याजवळ पोहोचले आणि घोषणाबाजी केली. गोंधळ वाढत गेला तेव्हा सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.