रात्रीचा प्रवास, दिवसा बैठका; परराष्ट्र दौऱ्यावर असताना असा वेळ वाचवतात पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 09:28 AM2022-05-22T09:28:16+5:302022-05-22T09:28:31+5:30
Narendra Modi : नुकत्याच झालेल्या जर्मनी आणि डेन्मार्कच्या दौऱ्यांत पंतप्रधान मोदी यांनी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये केवळ एकच रात्र घालवली. या पद्धतीने जपान दौऱ्यातही पंतप्रधान मोदी केवळ एकच रात्र घालवणार असून, रात्री पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या क्वाड शिखर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी टोकियोला जात आहेत. परदेश दौऱ्यांवेळी त्यांनी नेहमीच एक विशेष पॅटर्न फॉलो केला आहे. ते आपला वेळ वाचविण्यासाठी साधारणपणे रात्रीचाच प्रवास करतात. यावेळी ते फ्लाइटमध्येच आपली झोप पूर्ण करतात आणि दुसऱ्या दिवशी बैठका अथवा कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय ट्विट करत म्हणाले, “पंतप्रधान मोदी 22 मेच्या रात्री टोक्योला जाण्यासाठी रवाना होतील. ते दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे पोहोचतील आणि थेट कामाला लागतील. पंतप्रधान मोदी यांनी या महिन्यात एकूण 5 देशांचा दौरा केला आहे. वेळ वाचविण्यासाटी त्यांनी चार रात्री विमानातच घालवल्या असतील.”
नुकत्याच झालेल्या जर्मनी आणि डेन्मार्कच्या दौऱ्यांत पंतप्रधान मोदी यांनी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये केवळ एकच रात्र घालवली. या पद्धतीने जपान दौऱ्यातही पंतप्रधान मोदी केवळ एकच रात्र घालवणार असून, रात्री पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत.
पंतप्रधान मोदी 23 आणि 24 मेरोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड शिखर संम्मेलनात सहभागी होण्यासाठी जपान दौऱ्यावर जात आहेत. क्वाड ही ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स अथवा अमेरिका यांची एक आघाडी आहे. क्वाड शिखर सम्मेलनाला उपस्थित राहण्याशिवाय, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठकही करतील. एवढेच नाही, तर या दौऱ्या मोदी जपानी व्यापारी समुदाय आणि परदेशी भारतीयांशीही संपर्क साधतील.
जापानमध्ये एकूण 40 तासांच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 23 कार्यक्रमांत सहभागी होतील. या दरम्यान मोदी किमान 36 जापानी सीईओ आणि शेकडो भारतीय प्रवाशांसोबत संवाद साधतील.