नोटबंदीत नीरव मोदीनं 'अशी' साधली संधी; निकटवर्तीयांच्या मदतीनं कोट्यवधींची हेराफेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 09:46 PM2019-10-23T21:46:56+5:302019-10-23T21:49:26+5:30
नोटबंदीनंतर नीरव मोदीकडून कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीनं नोटबंदीत कोट्यवधींची कमाई केली. नोटबंदी होताच सर्वसामान्य जनता रांगेत उभी होती. काळा पैसा पदरी बाळगणाऱ्यांना नोटबंदीनं मोठा हादरा बसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. मात्र नोटबंदीच्या निर्णयाचा नीरव मोदीनं संधी म्हणून वापर केला आणि कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा केल्याचा दावा पत्रकार पवन सी. लाल यांनी त्यांच्या 'फ्लॉड- द राईज अँड फॉल ऑफ इंडियाज डायमंड मुघल नीरव मोदी' या पुस्तकातून केला आहे.
नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी दिल्लीतल्या 'गीतांजली'च्या एका ग्राहकाला एक मेसेज आला. गीतांजली नीरव मोदींच्या मालकीची कंपनी होती. 'आम्ही जुन्या नोटा स्वीकारतो', असा मेसेज गीतांजलीच्या एका ज्युनियर सेल्स असोशिएटनं ग्राहकाला पाठवला होता. हिऱ्यांच्या व्यापाऱ्यात रोख रकमेची देवाणघेवाण अतिशय सामान्य समजली जाते. मात्र नोटबंदीनंतर असा मेसेज आल्यानं गीतांजलीच्या ग्राहकाला आश्चर्य वाटलं, असा एक प्रसंग पुस्तकात आहे.
नोटबंदी झाल्यावर नीरव मोदी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी कशा पद्धतीनं काम केलं, याची माहितीदेखील लाल यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. नोटबंदीनंतर नागरिक त्यांचं ओळखपत्र दाखवून बँकांमध्ये पैसे जमा करू शकत होते. यावेळी एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पूर्वीपासूनच लाखो रुपये असल्यास प्राप्तीकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय येण्याची शक्यता नव्हती. मात्र त्या व्यक्तीनं खात्यात १० लाख रुपये जमा केले असते, तर संशय येण्याची शक्यता होती. याची काळजी नीरवनं घेतली.
नीरव मोदी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी नोटबंदीचा फायदा घेत त्यांच्याकडे असणारी अघोषित रोख रक्कम बँकेत जमा केली. यासाठी त्यांनी गीतांजली कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. नीरवनं त्याच्याकडे असणारी अघोषित रोख रक्कम कर्मचाऱ्यांना दिली. १० लाखांची रक्कम २० कर्मचाऱ्यांमध्ये वाटल्यानं प्रत्येक कर्मचाऱ्याकडे काही हजार रुपये आले. कर्मचाऱ्यांनी घरात करून ठेवलेली बचत म्हणून ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा केली. त्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात सामावून घेण्यात आली.