नवी दिल्ली, दि. 3 - आज सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करताना निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये निर्मला सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यांनी सर्वात चर्चा झालेल्या संरक्षण मंत्रिपदी निर्मला सीतारामन यांची निवड झाली. सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवककल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आला. या फेरबदलात एकमेव महिला मंत्र्याचे नाव होते ते म्हणजे निर्मला सीतारामन यांचे. सीतारामन या आता देशाच्या संरक्षणमंत्री झाल्या आहेत. त्या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी 1975 साली काही काळ आणी 1980 ते 1982 या काळात देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले होते.निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ आँगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नँशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी प्राइसवाँटर कूपर्स आणि बीबीसीमध्ये काही काळ काम केले. निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत. 2006 साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. उत्तम इंग्लिश, सफाईदार मुद्दे मांडणे यामुळे त्या भाजपाची इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. २०१४ साली त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत.
निर्मला सीतारामन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री, इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपदी निवड झालेल्या दुसऱ्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 1:58 PM