नितीन गडकरी (Nitin Gadkari), केंद्रातील एक भारदस्त नेतृत्व. देशाच्या वाहिन्या म्हणतात ते म्हणजे रस्त्यांचे खाते हातात. कोणाचीही भीडभाड न ठेवता मनात येईल ते, पटेल ते बोलून मोकळे होतात. आज याच गडकरींनी त्यांच्यातील साधा माणूस जगाला दाखविला. विमानात जाण्य़ासाठी ते सामान्यांच्या रांगेत उभे राहिले. खरेतर ते व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री. सामान्यांना थांबवून ते विमानात (Flight) जाऊ शकले असते. परंतू त्यांनी तसे केले नाही. या त्यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
नितीन गडकरींना गो इंडिगोच्या विमानातून प्रवास करायचा होता. इंडिगो ही कमी दरात, सामान्य प्रवाशांसाठी विमानसेवा देणारी कंपनी. यातच तिचे यश लपले आहे. मध्यम वर्गीय, कंपन्यांचे कर्मचारी आदींना अन्य विमान कंपन्यांपेक्षा कमी दरात सेवा पुरविते. नितीन गडकरी देखील याच विमानाने जाणार होते. विमानात जाण्यासाठी ते अन्य प्रवाशांप्रमाणे बसने तिथे पोहोचले. आता मंत्री म्हटल्यावर त्यांना पहिले प्राधान्य दिले जायला हवे होते. तसे अन्य मंत्री करतातही. किंवा उशिरा येतात. या मंत्र्यांसाठी विमाने तासंतास थांबवावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत.
परंतू गडकरींनी अन्य प्रवाशांसोबत रांगेत उभे राहणेच पसंत केले. एका मागोमाग एक प्रवासी विमानात जात होता. तसे गडकरी पुढे पुढे जात होते. सोशल मीडियावर नवनीत मिश्रा नावाच्या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्यानुसार गडकरी विमानात जाण्यासाठी रांगेत वाट पाहत होते. हा व्हिडीओ आतापर्यंत 11.3 वेळा लाईक आणि 1900 हून अधिक वेळा शेअर केला गेला आहे.