देशाला महत्वाचा अटल टनेल मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने जम्मू काश्मिरकडे मोर्चा वळविला आहे. देशाहितासाठी आणि संरक्षणासाठी महत्वाचा असलेला आणखी एक बोगदा निर्माण प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट करणार आहेत. भारतीय सैन्य आणि सिव्हिल इंजिनअरांची टीम जोजिलाच्या खिंडीला पोखरून बोगदा बनविणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. या बोगद्याचे काम अशावेळी सुरु होत आहे, जेव्हा चीनसोबत लडाखमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण आहे. गडकरींनी सांगितले की, हा बोगदा बनविल्यानंतर श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहच्या भागात कोणत्याही सिझनमध्ये वाहतूक सुरु राहणार आहे. तसेच प्रवासाचा वेळही सव्वा तीन तासांनी कमी होणार आहे.
हा टनेल बनल्यानंतर भू स्खलनाची भीती दूर होणार आहे. यामुळे श्रीनगर ते लेह हा प्रवास राष्ट्रीय हायवेवरून कोणत्याही धोक्याशिवाय करता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत 14.15 किमीची लांब टनेल बनविली जाणार आहे. शिवाय 18.63 किमी लांबीचा अॅप्रोच रोडदेखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पातून 32.78 किमी लांबीचा रस्ता बनविला जाणार आहे.
या साऱ्या प्रकल्पासाठी 6808.63 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी 6 वर्षांचा वेळ लागणार आहे. तर अॅप्रोच रोड बनविण्यासाठी 2.5 वर्षे लागणार आहेत. दोन्ही कामे एकाचवेळी करण्यात येणार आहेत.
जोजिला खिंडीतून जाणारा हा रस्ता जगातील सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक मानला जातो. या दुर्गम रस्त्यावर वाहने चालविणे खूप जिकिरीचे आहे. हा बोगदा तयार झाला की लेह लडाख, कारगिल द्रास आणि सियाचिन वर्षभर देशासोबत जोडलेला राहणार आहे. सध्या या भागात सहा महिनेच वाहतूक सुरु असते. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ता बंद असतो. या बोगद्यामुळे ही समस्या दूर होणार आहे. तसेच सैन्याची वाहतूकही जलद आणि सोपी होणार आहे.