पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार हे सातव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपा आणि जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री असतील. तसेच हम आणि व्हीआयपीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे निश्चित झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावेही निश्चित झाली आहेत.नितीश कुमार हे आज संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. घटनात्मक तरतुदीनुसार २४३ सदस्य अशलेल्या बिहार विधानसभेमध्ये एकूण ३६ मंत्री बनू शकतात. मात्र सध्यातरी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश पदे ही रिकामी राहतील. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एकूण १६ मंत्र्यांचा आज शपथविधी होईल .सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूकडून आज बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, विजय चौधरी, श्रवण कुमार आणि लेसी सिंह हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. तसेच मेवालाल चौधरी आणि शीला मंडल यांच्या नावांचीही चर्चा आहे. मात्र या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.तर भाजपाकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, नंदकिशोर यादव, प्रेम कुमार आणि मंगल पांडेय मंत्री बनू शकतात. यांच्या पैकी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री बनतील. दरम्यान भाजपाकडून अद्याप काही नावांवर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.मित्रपक्षांपैकी हम पक्षाकडून संतोष मांझी यांना मंत्रिपद मिळू शकते. ते माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र आहेत. तर जीतनराम मांझी यांनी आपण मंत्री बनणार नसल्याचे स्पष्ट केले होते. व्हीआयपी पक्षाकडून पक्षाध्यक्ष मुकेश सहानी मंत्रिपदाछी शपथ घेऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.आज होणाऱ्या बिहार सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपाचे संघटन महासचिव बी. एल संतोष हे उपस्थित राहू शकतात.