नितिश कुमार ‘पद्मावती’च्या वादात; नृत्यालाच आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:21 AM2017-11-29T01:21:32+5:302017-11-29T01:21:47+5:30
‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच
नवी दिल्ली/पाटणा : ‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची भूमिका घेतली.
पाटण्यात नितिश कुमार म्हणाले की, या चित्रपटावरून वाद उत्पन्न झाले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यावर भूमिका स्पष्ट करेपर्यंत ‘पद्मावती’ बिहारमध्ये दाखवू दिला जाणार नाही. चित्रपटात राणी ‘पद्मावती’ला नृत्य करताना दाखविण्यासही त्यांनी आक्षेप घेतला.
सुप्रीम कोर्टाची नाराजी
मंत्री व मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तींच्या वक्तव्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे मन निष्कारण कलुषित होऊ शकते. त्यामुळे या मंडळींनी वाचाळपणा करण्याआधी कायद्याची चौकट आपल्यालाही लागू आहे, याचे भान ठेवायला हवे, अशी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पद्मावतीबद्दलची याचिका फेटाळली.