नवी दिल्ली - समता पार्टीच्या माजी अध्यक्षा आणि एकेकाळी केंद्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या नेत्या असलेल्या जया जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रातून एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. एकेकाळी लालूंच्या कारवायांमुळे हैराण झालेले नितीश कुमार हे आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते, असा उल्लेख जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. या आत्मचरित्रातून जेटलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या वर टीका केली आहे. जया जेटली आपल्या आत्मचरित्रात लिहितात, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यामुळे त्रस्त झालेले नितीश कुमार भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. जर समता पक्षाची स्थापना करून आम्ही निवडणूक लढलो नसतो तर कदाचित नितीश कुमार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असता. नितीश कुमार यांनी वैयक्तित हितांना नेहमीच प्राधान्य दिले होते. त्यामुळेच जॉर्ज फर्नांडिस यांनी केले अपिल डावलून नितीश कुमार यांनी माझ्याऐवजी उद्योगपती महेंद्र प्रसाद यांना राज्यसभेवर पाठवले होते. यावेळी सहकारी पक्षांकडे झालेले दुर्लक्ष आणि अहंकार यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकारला 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता, असा उल्लेख जया जेटली यांनी केला आहे. जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र कौतुक केले आहे. त्या लिहितात, "मोदी हे त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असूनही सहकारी पक्षांना सोबत घेतात. मोदी विरोधकांनाही भेटतात. त्यांच्याशी चर्चा करतात. गुजरामध्ये मोदींनी अगदी सहजपणे बदल घडवून आणला होता. पण देशात चांगले काम आणि बदल काही लोक सहजपणे मान्य करणार नाहीत." जया जेटली यांनी या आत्मचरित्रांमधून लालू, शरद आणि मुलायम सिंह या यादवांवरही जोरदार टीका केली आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीमधील अनुभवातून विविध नेत्यांबाबतचे मतही जेटली यांनी मांडले आहे. त्या लिहितात,"लालू आणि शरद यादव हे केवळ भाषणापुरते समाजवादी आहेत. मधु लियमे. जेपी आणि राममनोहर लोहिया यांचे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच राहणीमान होते. शरद यादव यांनी मी यादव आहे, असे थेट जाहीर केले होते. तर लालू आणि मुलायम यांनी जेवढा परिवारवाद वाढवला आहे. ते पाहिले असते तर लोहिया आणि मधु लिमये यांनी ते कदापि सहन केले नसते.
तेव्हा लालूंना वैतागलेले नितीशकुमार करणार होते भाजपामध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 3:38 PM