नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 08:55 AM2019-06-02T08:55:00+5:302019-06-02T08:56:20+5:30
बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या भाजपा आणि जदयूमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून फूट पडल्याचे दिसत आहे. जदयूला एकही मंत्रीपद न दिल्याने बिहारच्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रयोजन नितीशकुमार यांनी केले आहे. यामध्ये भाजपच्या एकाही मंत्र्याला शपथ देण्यात येणार नाही.
बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बऱ्याच काळापासून हा विस्तार रखडला होता. मात्र, जदयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरण जदयूने दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिपद आणि मोदी सरकारमध्ये जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून विस्ताराबाबत कळविले आहे. राजभवनात सकाळी 11.30 वाजता हा शपथविधी होईल. यामध्ये अशोक चौधरी, नीरज कुमार, लक्ष्मेश्वर राय, श्याम रजक, बीमा भारती, संजय झा, नरेंद्र नारायण यादव यांचा समावेश आहे.
या विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.
नितीशकुमारांवर लालूंच्या पक्षाची कुरघोडी
विधानसभा निवडणुका दीड वर्षावर आल्याने सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीत जदयू आणि लालू प्रसाद यादवाच्या पक्षाने हात मिळवत भाजपाला सत्तेपासून दूर सारले होते. मात्र, त्यांच्यात बेबनाव झाल्याने नितीशकुमारांनी भाजपाशी संधान साधत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली होती. याचा बदला लालूंचा पक्ष राजदने भाजपाच्या नेत्यांनाच इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. राबडीदेवी यांच्या घरी ही पार्टी आयोजित केली असून भाजपासोबत असलेले अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरु असून काँगेस पुन्हा नितीशकुमारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.