उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?
By admin | Published: July 10, 2017 01:59 PM2017-07-10T13:59:22+5:302017-07-10T13:59:22+5:30
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या महिन्यातही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना त्यांनी विरोधकांऐवजी सत्ताधा-यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही ते मोदींना साथ देण्याची शक्यता बळावली आहे.
पाटण्यामध्ये मंगळवारी जनता दल युनायटेडची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला जदयूचे आमदार आणि खासदार उपस्थित रहाणार आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेडचे सरकार आहे. सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यावर नितीश कुमार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने विविध तर्क-विर्तक काढले जात आहेत.
राजगीरहून रविवारी नितीश कुमार पाटण्यामध्ये दाखल झाले. विश्रांतीसाठी ते राजगीरला गेले होते. विरोधीपक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार पाटण्यामध्ये पोहोचल्या त्याचवेळी नितीशकुमार पाटण्याबाहेर गेले. जदयूच्या हालचालींवर विरोधीपक्षांचे बारीक लक्ष असून, एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला होता.
आणखी वाचा
मागच्या आठवडयात लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या बारा ठिकाणांवर छापे मारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे.
लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. सीबीआयच्या एफआयआरमध्ये लालूंची पत्नी, राबडी देवी, त्यांचा मुलगा तेजस्वी, आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पीके गोयल आणि सरला गुप्ता यांची नावे आहेत.
राष्ट्रपतीपद उमेदवार निवडीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या 17 विरोधी पक्षीय नेत्यांच्या बैठकीपासून दूर राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी झाले होते.