भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने स्थापन केला स्वतंत्र देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 04:10 PM2019-12-26T16:10:18+5:302019-12-26T16:12:23+5:30
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नित्यानंद बाबा देश सोडून पसार झाला होता
नवी दिल्ली - भारतातून फरार झालेला वादग्रस्त महाराज नित्यानंद बाबा याने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. नित्यानंद बाबा भारतातून फरार झाल्याचे साधारण महिन्याभरापूर्वी उघडकीस आले होतेय दरम्यान, आता त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात एक बेट विकत घेऊन तिथे स्वतंत्र देश स्थापन केल्याचा दावा करण्यात येत आहे. या देशाचे कैलासा असे नामकरण करण्यात आले असून, त्याचे स्वतंत्र सरकारही स्थापन करण्यात आले आहे. कैलासा हे हिंदू राष्ट्र असल्याचे जाहीर केले गेले आहे.
नित्यानंद बाबावर कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो देश सोडून पसार झाला आहे. यापूर्वीही नित्यानंद बाबावर अहमदाबादमधील स्वतःच्या आश्रमात मुलांचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याचा गंभीर आरोप झाला होता.
नित्यानंद विदेशात परागंदा झाला आहे, गरज पडल्यास गुजरात पोलीस योग्य कारवाई करून त्याची कोठडी मिळवेल. नित्यानंद कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देशातून पळून गेला आहे. त्याला शोधणे म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असेही अहमदाबाद पोलिसांनी सांगितले त्याच्याबाबत माहिती देताना सांगितले होते.
दरम्यान, नित्यानंद बाबाने कैलासा या राष्ट्राचे संकेतस्थळही सुरू केले आहे. या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कैलासा हा देशा कॅरेबियन बेटांमधील त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या जवळ आहे. दरम्यान, नित्यानंद बाबाने एखाद्या सार्वभौम देशाप्रमाणे कैलासा या देशाचे मंत्रिमंडळही बनवले आहे. या देशाच्या सरकारमध्ये पंतप्रधान, लष्करप्रमुख अशी पदेही निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती कैलासा या राष्ट्राच्या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे.