दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी फेटाळून लावली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याच्या चर्चा दिल्लीत जोरदार सुरू होत्या. मात्र मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असून आपसोबत आघाडी होणार नसल्याचे शीला दिक्षित यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपची आघाडीची चर्चा सुरू होती. दिल्लीतील लोकसभेच्या एकूण 7 जागेपैकी प्रत्येकी 3-3 जागा काँग्रेस-आप लढू शकते तर 1 जागा अन्य एकाला दिली जाऊ शकते. अशारितीचा फॉम्युलाही समोर आला होता. मात्र दिल्ली काँग्रेसमध्ये आम आदमी पार्टीशी आघाडीबाबत मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर मंगळवारी दिल्लीतील नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, काँग्रेसचे नेते अजय माकन तसेच दिल्ली काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस दिल्लीत सर्व 7 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नसल्यानेच दोन दिवसांपुर्वी आम आदमी पक्षाने दिल्लीत 7 पैकी 6 जागांसाठी उमेदवार यादी निश्चित केली. 2014 च्या निवडणुकीत दिल्लीतील सर्व 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून मोठा पराभव भाजपला सहन करावा लागला होता. देशभरात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न होत असताना दिल्लीत काँग्रेस-आप आघाडी न झाल्याने भाजपाला याचा फायदा होणार का हे येणाऱ्या काळात दिसेल.
मागील आठवड्यात दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी आपसोबत आघाडी होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केले होते.