नवी दिल्ली - शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेने 325 विरुद्ध 126 अशा मोठ्या फरकाने फेटाळून लावला. त्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अद्यापही भक्कम पाठबळ असल्याचे समोर आले आहे. मात्र लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विश्वास जिंकला तरी पुढील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आणि भाजपाचे टेन्शन वाढले आहे. भाजपाचे मित्र पक्ष दुरावले लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने अविश्वास प्रस्तावाबाबत भाजपाला फारशी चिंता नव्हती. मात्र याप्रसंगी जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला साथ न दिल्याने मोदी आणि शहा कंपनीची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना भाजपाला साथ देईल, असे वाटले होते. मात्र शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला धक्का दिला. शिवसेनेची हीच भूमिका कायम राहिल्यास येत्या निवडणुकीत भाजपाला महराष्ट्रामध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील एआयएडीएमकेने मोदी सरकारला पाठिंबा दिला असला तरी राज्याच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करत मोदी सरकारपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींचा हल्लाबोलअविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या जोरदार भाषणामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. राफेल करारापासून ते मॉब लिचिंगपर्यंत सर्व प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदी आणि अमित शाह या भाजपातील सध्याच्या सर्वशक्तिमान नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. विरोधकांची एकजूट विपक्ष एकजुट नजर आया विरोधी पक्षांची एकजूटही दिसून आली. विरोधी पक्षांनी विविध विषयांवरून सरकारला घेरले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत असताना भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राहुल गांधींना विरोधी बाकांवरून भक्कम साथ मिळाली. तृणमूल काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच तेलुगू देसमचे खासदारही राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत ही परिस्थिती पाहता मोदी सरकार आणि भाजपासाठी पुढचे दिवस आव्हानात्मक असणार आहेत.
No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 8:36 AM