No Confidence Motion: मोदींची मोठी खेळी, अविश्वास प्रस्तावाला होकार देण्यामागे वेगळंच राजकारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:09 AM2018-07-19T11:09:17+5:302018-07-19T11:11:42+5:30
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेमध्ये एनडीकडे 312 खासदारांचे बळ आहे. त्यामुळे मोदी सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याविषयी फारशी चिंता नाही. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात सरकारने केलेले काम आणि योजनांची माहिती देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याची आणि अनेक राजकीय मुद्द्यांवरून विरोधी पक्षांना घेरण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांवर हल्लाहोल करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या प्रभावी वक्त्यांना पुढे करणार आहे. अविश्वास प्रस्तावावर बोलणाऱ्या वक्त्यांची नावे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. मात्र फर्डे वक्ते म्हणून ओळखले जाणारे केंद्र सरकारमधील मंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि रविशंकर प्रसाद यांच्यावर विरोधकांचा सामना करण्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते. तसेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान दलितांच्या मुद्द्यावर सरकारची बाजू मांडतील तर अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल या मागास वर्गाची बाजू मांडण्याची शक्यता आहे.
या अविश्वास प्रस्तावावरील अंतिम भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. या भाषणात मोदी तीन तलाक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्न तसेच सरकारच्या इतर योजनांबाबत उल्लेख करतील. तसेच काँग्रेस आणि विरोधकांच्या एकजुटीवरही मोदी आपल्या भाषणातून प्रहार करण्याची शक्यता आहे.
भाजपाने सभागृहातील आपल्या नेत्यांना सहकारी आणि समान विचारधारा असलेल्या पक्षांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. अविश्वास प्रस्तावादरम्यान, शिवसेना, टीआरएस, एआयएडीएमके हे पक्ष आपल्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भाजपाला आहे. तसेच 20 खासदार असलेला बीजू जनता दलही काँग्रेसपासून दूर राहण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याकडे अविश्वास प्रस्तावासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान मोदींना देशाचे समर्थन आहे. सभागृहात ठरावाचा सामना करायला सरकार तयार आहे. ठरावाचे आम्ही स्वागत करतो, तसेच एनडीए अविश्वास प्रस्तावाविरोधात एकजुटीने मतदान करील असा विश्वास भाजपा नेते अनंत कुमार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सगळे विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करतात की सभागृहातून वॉकआऊट करतील हे पाहावे लागेल.