No Confidence Motion : मोदी सरकार हे 21व्या शतकातील ''जुमलास्त्र''
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:26 PM2018-07-20T13:26:25+5:302018-07-20T13:42:16+5:30
तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला, भारतीय जनता पार्टीचे खासदार राकेश सिंग यांनी आपापल्या पक्षांची बाजू अविश्वास दर्शक ठरावात मांडली.
नवी दिल्ली - तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला, भारतीय जनता पार्टीचे खासदार राकेश सिंग यांनी आपापल्या पक्षांची बाजू अविश्वास दर्शक ठरावात मांडली. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसची बाजू लोकसभेत मांडताना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारचा उल्लेख जुमला स्ट्राइक, असा करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळावर टीका केली.
तेलगू देसमचे गल्ला यांच्या भाषणामध्ये मला दुःख दिसले. तुम्ही 21 व्या शतकातील राजकीय शस्त्राचे बळी आहात. तुमच्या सारखे अनेक या शस्त्राला बळी पडले आहेत. या शस्त्राचे नाव जुमला स्ट्राईक असे आहे. या देशाचे शेतकरी, तरुण लोक, दलित, आदिवासी आणि महिला या जुमला स्ट्राइकचे बळी आहेत. असे सांगत राहुल गांधी यांनी मी मोदी सरकारचे काही जुमले वाचून दाखवतो असे सांगत प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये येणार हा पहिला जुमला आहे असे सांगितले होते तर दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार मिळेल हा दुसरा जुमला होता असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात युवकांच्या रोजगाराची भाषा करत असतात. मात्र त्यांनी कदीच वचन पाळले नाही. ते कधी पकोडे तळायला सांगतात, कधी दुकान उघडायला सांगतात.
नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटाबंदीचा निर्णय घेतला. कदाचित त्यांना शेतकरी, गरिब आपला व्यवसाय नोटांमध्ये चालवत असतात हे त्यांना माहिती नव्हतं. सुरतला मी गेलो असताना तेथिल गरिबांनी नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी दुखापत नोटाबंदीच्या माध्यमातून आम्हाला केली. नरेंद्र मोदी नोटाबंदीवरच थांबले नाहीत. आम्ही देशभरात एक जीएसटी असेल, त्यात पेट्रोल-डिझेलचा त्यात समावेश असेल अशी मांडणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच प्रकारचे जीएसटी आणले आहेत. ते परदेशात जातात तेव्हा ते केवळ मोजक्या उद्योजकांना भेटतात, त्यांच्या मनात गरीब व्यक्तीला स्थान नसते. जिओच्या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येते. काही ठराविक उद्योजकांसाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत, त्यांच्या हृद्यात गरिबांसाठी थोडीशीही जागा नाही अशी टीका राहुल यांनी केली.